पाकिस्तान विमान दुर्घटना : पायलटच्या ‘अति’ हुशारीनं घेतला 97 जणांचा बळी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये ईदच्या आधी झालेल्या विमान दुर्घटनेबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाइन्स (पीआयए) च्या पायलटच्या एका छोट्या चुकीमुळे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानाच्या लँडिगपूर्वी उंची आणि गतीबाबत हवाई वाहतूक नियंत्रकांनी पायलटला तीनवेळा सूचना दिली होती, परंतु त्याने याकडे दुर्लक्ष केले. पायलटला विश्वास होता की, तो स्थिती नियंत्रणात ठेवू शकतो.

पीके-8303 मध्ये 97 लोक मारले गेले आणि दोघेजण आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. हा अपघात पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक विमान अपघातांपैकी एक आहे. रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे की, लाहोरहून कराचीपर्यंतचा एयरबेस ए-320, जिना अंतरराष्ट्रीय विमानतळापासून 15 समुद्री मैल अंतरावर होता. तेव्हा 7,000 ऐवजी हे विमान जमीनीपासून 10,000 फुट उंचीवरून उडत होते, तेव्हा एयर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ने विमान खाली आणण्यासाठी पहिली सूचना दिली होती.

जियो न्यूजने एटीसी रिपोर्टच्या संदभाने म्हटले आहे की, पायलटने उंची कमी करण्याऐवजी उत्तर दिले की तो निश्चिंत आहे. जेव्हा विमानतळापर्यंत केवळ 10 समुद्री मैल अंतर होते, तेव्हा विमान 3,000 फुट ऐवजी 7,000 फुट उंचीवर होते. एटीसीने विमानाची जमिनीपासूनची उंची कमी करण्याची दुसरी सूचना दिली. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पायलटने पुन्हा उत्तर दिले की तो निश्चिंत आहे आणि स्थितीवर नियंत्रण ठेवू शकतो, तो लँडिंगसाठी तयार होता.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, विमानात दोन तास आणि 34 मिनिटे उडण्यासाठी पुरेल इतके इंधन होते, तर विमानाची एकुण उड्डाणाची वेळ एक तास आणि 33 मिनिटे नोंदण्यात आली होती. पाकिस्तानी तपासकर्ते हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, दुर्घटना पायलटच्या त्रुटी किंवा तांत्रिक गडबडीमुळे झाली आहे का. देशाच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने तयार केलेल्या रिपोर्टनुसार, विमानाच्या इंजिनने पायलटने लँड करण्याच्या पहिल्या प्रयत्नावेळी तीन वेळा रनवेवर ओरखडे ओढले होते, ज्यामुळे घर्षणातून आग भडकली, असे तज्ज्ञांनी सांगितले.

जेव्हा विमानाचा लँडिगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तेव्हा इंजिनातील तेल आणि इंधन पंपाचे नुकसान झाले आणि त्यातून गळती सुरू झाली. पहिल्यांदा उतरण्यात अपयश आल्यानंतर पायलटने एटीसीला सांगितले की, लँडिंग गियर उघडत नाही. विमान 3,000 फुटापर्यंत घेऊन जाण्याचे निर्देश पायलटला एयर ट्रॅफिक कंट्रोलरने दिले होते, परंतु तो केवळ 1,800 फुटावर जाण्यास यशस्वी झाला. जेव्हा कॉकपिटला 3,000 फुटावर जाण्यास दुसर्‍यांदा सांगण्यात आले, तेव्हा पायलटने म्हटले, आम्ही प्रयत्न करत आहोत.

तज्ज्ञांनी म्हटले की, योग्य उंची गाठण्यात अडचण येणे म्हणजे इंजिन काम करत नव्हते. विमान, त्यानंतर एका बाजूला झुकले आणि अचानक दुर्घटनाग्रस्त झाले. कराचीच्या जिना अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या काही मिनिटांपूर्वी मॉडल कॉलनीजवळ जिना गार्डन क्षेत्रात विमान दुर्घटनाग्रस्त झाले. ज्यामुळे जमीनीवरील 11 लोकसुद्धा गंभीर जखमी झाले.

विमान दुर्घटना आणि तपास पथकाचे अध्यक्ष, एयर कमांडर मुहम्मद उस्मान गनी यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने सुमारे तीन महिन्यात पूर्ण रिपोर्ट सादर होईल असे म्हटले आहे. पीआयएच्या इंजीनियरिंग आणि देखरेख विभागानुसार, यावर्षी 21 मार्चला विमानाचे अंतिम परीक्षण करण्यात आले होते आणि विमानाने दुर्घटनेपूर्वी एक दिवसआधी मस्कत ते लाहोरसाठी उड्डाण घेतले होते. कोविड-19 महामारीचा विचार करून पाकिस्तान सरकारने 16 मेपासून पाच प्रमुख विमानतळांवर – इस्लामाबाद, कराची, लाहोर, पेशावर आणि क्वेटापासून देशांतर्गत उड्डाणांना परवानगी दिली होती.