काय सांगता ! होय, पाकिस्तानातील 40 % पायलटांकडे ‘बोगस’ परवाने

पोलिसनामा ऑनलाईन – कराचीत मागील महिन्यात झालेल्या विमान अपघातात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघाताच्या तपासाचा अहवाल बुधवारी संसदेत सादर करण्यात आला. हा अहवाल सादर करताना विमान वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान यांनी सरकारी विमान कंपन्यांमध्ये 40 टक्के वैमानिकांकडे बनावट परवाने असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.

सरवर म्हणाले, या विमानाचे पायलट अति आत्मविश्वासात होते. त्यांनी विमानाकडे लक्ष दिले नाही. एटीसीने त्याला विमानाची उंची वाढवण्यास सांगितली होती. प्रत्युत्तरादाखल एका पायलटने सांगितले की, आम्ही सर्व काही सांभाळू. संपूर्ण उड्डाणादरम्यान, दोन्ही वैमानिक कोरोना व्हायरसपासून कुटुंबास वाचविण्याविषयी बोलत राहिले. तपासाचा प्रारंभिक अहवाल सादर करताना सरवर म्हणाले की अपघातास जो जबाबदार असेल त्याला वाचवले जाणार नाही. वैमानिकांनी लँडिंग गिअर न उघडता तीन वेळा लँडिंगचा प्रयत्न केला. यामुळे विमानाचे इंजिन खराब झाले. आणि नंतर विमान कोसळले. पायलट आणि एटीसी यांच्यात चर्चेची संपूर्ण नोंद आमच्याकडे आहे. मी ते स्वतः ऐकले आहे. सरकारी विमान कंपन्यांमध्ये 40 टक्के पायलट असे आहेत जे बनावट परवान्यासह विमानांचे उड्डाण करतात. या लोकांनी कधीही परीक्षा दिली नाही किंवा त्यांना उड्डाणांचा अनुभवही नाही. त्यांच्या भरतीत राजकीय हस्तक्षेप आहे. त्यांच्या वैमानिकांच्या डिग्रीदेखील बनावट असल्याचे आढळून आले आहे.