ऐकावे ते नवलच ! चक्क देवघराखाली आढळला 2200 लिटर गावठी दारुचा मोठा साठा; हिंजवडी पोलिसांची कारवाई

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सध्या गावठी दारुविरोधात मोहिम उघडली असून त्यात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी दारु बाळगणार्‍या, त्याची विक्री करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल केले जात आहे. हिंजवडी पोलिसांनी हातभट्टीची दारु विक्री करणार्‍या ११ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातील एका कारवाईत २ महिलांचा समावेश आहे.

हिंजवडीतील दत्तवाडी येथे एका घरात चक्क देवघराखाली तळघर केल्याचे आढळून आले. त्यात २ हजार २०० लिटर गावठी दारु आढळून आली. हिंजवडी पोलिसांनी दत्तवाडी येथील शिवांजली कॉलनीजवळ हातभट्टी विकली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा घातला. त्यावेळी त्यांना कोठेही दारु दिसून आली नाही. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी ज्योती अविनाश मारवाडी, पायल येशू मारवाडी आणि अविनाश मारवाडी यांच्याकडे चौकशी केली. पण, त्यांनी काहीही माहिती दिली नाही. तसेच आपल्याकडे दारु नसल्याचे सांगितले. तरीही पोलिसांचा संशय कमी झाला नाही. त्यांनी घराची झडती घेतली. तेव्हा त्यांना तेथेही काही आढळले नाही. त्याचवेळी त्यांचे जमिनीवर असलेल्या देवघराकडे लक्ष गेले. संपूर्ण घराच्या खोलीमध्ये ते काहीसे विचित्र दिसत होते. तेथील फरशी निघाल्यासारखी दिसत होती. त्यांना देवघर बाजूला करायला सांगितले. त्यांनी काही नाही, देवघर असल्याचे सांगितले. पण ते बाजूला केल्यावर तेथील फरशी काढल्यावर खाली चक्क मोठे तळघर आढळून आले. त्यात २० लिटरचे कॅन मोठ्या प्रमाणावर ठेवलेले आढळले. एक कॅन बाहेर येईल व एक माणूस खाली जाऊ शकेल, इतकेच त्या तळघराचे तोंड होते. पोलिसांनी खाली जाऊन सर्व कॅन बाहेर काढले, तेव्हा तेथे तब्बल २ हजार २०० लिटर गावढी दारु आढळून आली.

दत्तवाडी, हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. या ठिकाणी काम करणार्‍या मजुरांना या दारुचा पुरवठा केला जात असल्याचे चौकशीत आढळून आले. देवघराखाली तळघर करुन त्यात गावठी दारुचा साठा करण्याची ही कल्पना पाहून पोलीसही हबकुन गेले होते.