पिंपरीमध्ये कार आणि टेम्पोचा भीषण अपघात, दोन जखमी, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद (व्हिडिओ)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहतूक बंद असून रस्ते मोकळे आहेत. मात्र काही दिवसांपासून लॉकडाऊच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता दिल्याने रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. वाहतूक वाढली असली तरी चौकातील सिग्नल बंद असल्याने वाहन चालक वेगाने गाडी चालवत आहेत. यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ता मोकळा असेल असा समज करून तुम्ही काही कामासाठी भरधाव वेगात जात असाल तर तुमचा अपघात होऊ शकतो. पिंपरी-चिंचवडमध्ये अशाच भरधाव वेगात जाणाऱ्या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असून अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य चौक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी एकच्या सुमारास झाला. यामध्ये मुंबई-पुणे महामार्गावरून कासारवाडीकडून भरधाव वेगात येणाऱ्या कारची धडक समोरून येणाऱ्या तीन चाकी टेम्पोला बसली. यामध्ये टेम्पोमधील दोघेजण टेम्पोतून उडून बाहेर पडले.

हा अपघात एवढा भीषण होता की, तीन चाकी टेम्पो पुढे जाऊन बीआरटी साठी उभारण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक बॅरेकेट्सवर चढला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांच्या धडकेत रस्त्याच्या कडेला असलेले संरक्षक कठडे तुटले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून शहरातील मुख्य चौकातील सिग्नल बंद आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून शहरातील हा पहिलाच भीषण अपघात असून नागरिकांनी मुख्य चौकातील सिग्नल सुरु करण्याची मागणी करत आहेत.