पिंपरी चिंचवडमध्ये नंग्या तलवारी नाचवत चोरट्यांचा धूमाकूळ

पिंपरी : पोलीसनाम ऑनलाईन – पिपंरी चिंचवडमध्ये घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी अक्षरश: धूमाकूळ घातला आहे. रावेतमध्ये शिंदेवस्ती जवळ असलेल्या शंकेश्वर व्हिला सोसायटीमध्ये घुसलेल्या चोरट्यांनी चक्क नंग्या तलवारी नाचवत फ्लॅट फोड़ून लाखोंचा ऐवज लंपास केला. अंगाचा थरकाप उड़विणारा हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे. यावेळी जर कुणी प्रतिकार केला असता तर तो जीवावर बेतले असते.

पिंपरी चिंचवडमध्ये घरफोड्या करणाऱ्या चोरट्य़ांच्या टोळ्या सक्रीय झालेल्या आहेत. मंगळवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास रावेतमध्ये असलेल्या शिंदे वस्ती जवळील शंकेश्वर व्हिला सोसायटीमध्ये घुसले. त्यांच्या हातात, तलवारी, कोयते, कटावणीसारखी हत्यारं दिसत आहेत.

या चोरट्यांनी आपल्या हातातील नंग्या तलवारी नाचवत कटावणीच्या साह्याने फ्लॅट फोडले. दरम्यान त्यांनी येथे ४ फ्लॅट फोडले. त्यानंतर हुशारी दाखवत परत जाताना सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शनच तोडून टाकले. त्यांनी येथील ४ फ्लॅट फोडून जवळपास १५ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. देहूरोड पोलिसांनी सोसायटीला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान देहूरोड पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.