पिंपरी : डंपरने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन –  भरघाव वेगात जाणाऱ्या एका डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड परिसरात सायंकाळी ५ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

यात सनी नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, स्वप्नील हा गंभीर जखमी आहे. सनी आणि स्वप्नील भोसरीकडून पिंपळे सौदागरच्या दिशेने जात होते. त्यावेळी कासारवाडी येथील नाशिक फाट्या जवळ त्यांच्या दुचाकीला एका डंपरने जोरदार धडक दिली.

यासंदर्भात प्रत्यक्षदर्शी महादेव कदम यांनी सांगितलं, “नाशिक फाट्यावरुन मी पिंपळे सौदाकारकडे निघालो होतो. नाशिक फाट्याजवळ आल्यानंतर हा अपघात पाहिला आणि थांबलो. १००, १९८ या क्रमांकावर पोलिसांना मदतीसाठी वारंवार दूरध्वनी वरुन संपर्क साधला. मात्र, कोणीही प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ वाट पाहिली, त्यानंतर दोन-तीन नागरिकांच्या मदतीने जखमी स्वप्नीलला माझ्या कारमधून पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले.”

‘नाशिक फाट्याजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाठवले असून, पुढील कारवाई सुरु असल्याचे,’ भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे यांनी सांगितलं.

दरम्यान, आजच्या आपघातानंतर बराच वेळ जखमी तरुणास पोलिसांच्या मदतीसाठी रस्त्यावर पडून राहावे लागले. अशावेळी पोलिसांच्या मदतीची आवश्यकता असताना, संपर्क केल्यानंतर पोलीस प्रतिसादही देत नसल्याचा आरोप, स्थानिक नागरिकांनी केला. जखमीवर उपचार सुरु असून, डंपर चालकाचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

You might also like