पिंपरी : वाहन चोरी विरोधी पथकाकडून 18 वाहने जप्‍त

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील वाढत्या वाहनचोरीचे प्रकार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी स्थापन केलेल्या वाहनचोरी विरोधी पथकाने चार वाहनचोरांना अटक करुन त्यांच्याकडून 10 लाख 30 हजार रुपयांच्या 18 मोटारसायकल आणि एक टेम्पो जप्त केला आहे. तसेच दोन एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त राजाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रविण गोरक्षनाथ गाडे (26, सध्या रा. बाकी, ता. खेड, जि. पुणे. मुळ रा. सावरगावतळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), नितिन मच्छिंद्र नेहे (23, रा. सावरगावतळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), निखिल बाळसाहेब गाडे (24, रा. सावरगावतळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), हरीष लक्ष्मण गाडे (27, सध्या रा. आळंदी, पुणे. मुळ रा. सावरगावतळे, ता. संगमनेर, जि अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

महिंद्रा कंपनीसमोर तीन इसम येणार असून त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती पोलीस पथक म्हाळुंगे परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक सचिन उगले आणि विनोद साळवे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त आर के पदमनाभन, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) सुधिर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे-1) राजाराम पाटील, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे-2) श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानूदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, विवेकानंद सपकाळे, दादा पवार, रमेश गायकवाड, विनोद साळवे, सचिन उगले, अरुण नरळे, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस कर्मचारी सचिन मोरे, जमिर तांबोळी, राजकुमार हनमंते, योगेश कोळेकर, योगेश आढारी, त्रिनयन बाळसराफ, सागर जैनक, महेश भालचीम, विठठल सानप, गंगाधर चव्हाण, नाशा केकाण, राहुल खारगे यांच्या पथकाने महिंद्रा कंपनीच्या गेटवर सापळा रचला.

पोलिसांची चाहूल लागताच संशयित तिघेजण पळून जाऊ लागले. पोलिसांनी शिताफीने पळून जाणा-या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकल बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी गुन्हे शाखा युनिट तीनच्या कार्यालयात आणून तिघांकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेली मोटारसायकल चोरीची असल्याचे सांगितले. प्रवीण याने त्याचा साथीदार मित्र हरीश याच्यासोबत मिळून संगमनेर, आळेफाटा, मंचर, सिन्नर, खेड, चिखली, पिंपरी, चिंचवड, निगडी, हिंजवडी परिसरातून चोरल्याचे सांगितले. आरोपींकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या 18 मोटारसायकल जप्त केल्या. तसेच प्रवीण आणि निखिल या दोघांनी खालुंब्रे व खेड भागात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.