Coronavirus : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60 टक्क्यांजवळ

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण देखील वाढत आहे. शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा चार हजाराच्या जवळ पोहचला आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 2370 झाली आहे. शहरामध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 59.63 टक्के झाले आहे.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊन नंतर अनलॉक 1 मध्ये शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सध्या शहरात रुग्ण वाढीचे प्रमाण 38.87 टक्के असून यामध्ये अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 1545 इतकी झाली आहे. शहरामध्ये आतापर्यंत 85 (शुक्रवारच्या आकडेवारीनुसार) जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 53 आणि शहराबाहेरील 32 जणांचा समावेश आहे. शहरातील मृत्यू होण्याचे प्रमाण 1.48 टक्के आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयात शुक्रवार (दि.3) पासून कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे. आयससीएमआरच्या मान्यतेने पिंपरी चिंवडमधील वायसीएमएच रुग्णालयात स्वॅब तपासणी करण्यासाठी स्वतंत्र कोविड लॅब सरु करण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेला लॅब सुरु करण्याचा बहुमान मिळाला असून राज्यातील ही तिसरी महापालीका ठरली आहे.