पिंपरी : 262 बेशिस्त वाहन चालकांचे परवाने रद्द

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणा-या 262 वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवणा-या चालकांमुळे सर्वाधिक अपघात होत आहेत. यामुळे अनेक नागरिकांचा नाहक बळी जात आहे. अशा वाहन चालकांवर वचक बसावा यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने कठोर कारवाई सुरु केली आहे. 1 जानेवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत 262 वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणा-या रिक्षांवर देखील कारवाई केली आहे. चार हजार 874 रिक्षांवर कारवाई करत 11 लाख 67 हजारांचा दंड घेण्यात आला आहे. तसेच 165 अवैध प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. ड्रंक अँड ड्राइव्ह करणा-या 195 वाहन चालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

रॉंग साईडने वाहन चालवणा-या एक हजार 358 वाहनचालकांवर कारवाई करत त्यांच्यावर एक लाख 35 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ओव्हर स्पीडने वाहन चालवणा-या 642 जणांना सहा लाख 47 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वाहनांना काळ्या काचा लावलेल्या एक हजार 241 वाहनांवर कारवाई करून तात्काळ काळ्या काचांचे फिल्मिंग काढण्यात आले. तसेच त्या वाहनचालकांना दोन लाख 48 हजार 200 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन न करण्याबाबत वाहन चालकांमध्ये शिस्त लागावी यासाठी कारवाई आवश्यक आहे. सुरुवातीला नियमभंग करणा-या चालकांचा परवाना निलंबित करण्यात येतो. परवाना निलंबित करूनही चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. तर संबंधित चालकावर परवाना रद्दची देखील कारवाई होऊ शकते. त्यानंतर, संबंधित चालकाला कोणतेही वाहन चालवण्याची परवानगी मिळणार नाही.