पिंपरी : ‘तिच्या’साठी पत्नीला सोडण्याची तयारी ठेवणारा ‘गोत्यात’, पोलिसांनी केलं ‘लॉकअप’मध्ये बंद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणीसाठी स्वतःच्या बायकोला सोडायला तयार झालेल्या तरुणाला ‘लॉकअप’ची हवा खायला लागली. हा प्रकार मोरेवस्ती चिखली, देहूरोड, तळवडे या ठिकाणी घडला आहे.
प्रवीण बाळासाहेब गायकवाड (28, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आरोपीने फिर्यादी महिलेचा पाठलाग केला. वेळोवेळी जवळीक साधण्यासाठी महिलेला रस्त्यात थांबवून मारण्याची धमकी देत नाहक त्रास दिला. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी पावणेपाचच्या सुमारास मुलाला क्लासला सोडून दुचाकीवरून एकट्या जात होत्या.

महिलेला पाहिल्यानंतर आरोपीने महिलेला थांबवले. ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्याशी तू बोलत जा. मला तू पाहिजे आहे’. तुझ्यासाठी मी माझ्या बायकोला सोडायला तयार आहे. तू फक्त हो म्हण’ असे म्हणत त्याने महिलेशी गैरवर्तन केले. याबाबत महिलेने गुरुवारी (दि. 20) फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.