Lockdown : पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसाला काठी तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण, वडिल युनूस अत्तार याच्यासह मुलं ‘मतीन’ आणि ‘मोईन’वर FIR (व्हिडीओ)

पुणे/वाकड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान पोलीस दिवस-रात्र कर्तव्य बजावत आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करत आपले कर्तव्या बजावत आहे. मात्र, नागरिकांकडून पोलिसांवर हल्ले केले जात आहेत. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पोलीस शिपायाला काठी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.27) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काळेवाडी येथील श्रीकृष्ण कॉलनी, जामा मस्जीद जवळील भारतमाता चौकात घडली.

याप्रकरणी युनुस गुलाब आत्तार (वय-50), मतिन युनुस आत्तार (वय-28) आणि मोईन युनुस आत्तार (वय – 24 तिघे रा. श्रीकृष्ण कॉलनी, जमा मस्जीद जवळ, भारतमाता चौक, काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई शंकर विश्वंबर कळकुटे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून येत असून राज्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास बंद आहे. त्यामुळे वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून गस्त घातली जात आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलीस शिपाई शंकर कळकुटे हे भारतमाता चौकात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी आरोपी युनूस आत्तार हा रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून आला.

पोलीस शिपाई कळकुटे यांनी त्याला हटकले असता त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याचे दोन मुले त्या ठिकाणी आले. त्यांनी देखील कळकुटे यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यांनी फिर्यादी यांना काठी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या हाताती काठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी हे करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.