पिंपरी : कोरोनामुळे शहरात चौघांचा मृत्यू तर 24 नवीन पॉझिटिव्ह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. एकाच दिवशी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील २ महिला व शहराबाहेरील २ पुरूषांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील मृतांची एकूण संख्या २४ झाली आहे. ‘कोरोना’ने मृत्यू होण्याचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आकडा आहे. तर आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील २४ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे आजपर्यंत बाधित झालेल्या रूग्णांची संख्या ५५९ वर पोहचली आहे.

तीन दिवसांपूर्वीच शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५०० च्या पुढे गेला होता. आकडा वाढत असला तरी मृत्युचे प्रमाण अत्यल्प असल्याने काहीसा दिलासा मिळत होता. परंतु एकाच दिवशी झालेल्या ४ मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. आज मृत झालेले रुग्ण वाल्हेकरवाडी (स्त्री वय-४० वर्षे), दापोडी (स्त्री वय- ५५ वर्षे), मंगळवार पेठ पुणे (पुरुष वय – ७९ वर्षे) व दौंड (पुरुष वय- ६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत. सद्यस्थितीत शहरात २६० रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत शहरातील १० रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या १४ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सायंकाळी ४.३० वाजेपर्यंतच्या दिलेल्या अहवालानुसार शहरात आज २४ कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण आढळले आहेत. आनंदनगर, वाकड, पिंपळे सौदागर, काळेवाडी, भोसरी, दापोडी, पिंपरी, किवळे, सांगवी, अजंठानगर या परिसरातील रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर शहराबाहेरील कसबा पेठ, आंबेगांव, दौंड, खडकी, देहूरोड येथील १० पॉझिटिव्ह रूग्ण शहरातील रूग्णालयात दाखल झाले आहेत. शहरात सध्या २३२ बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर आजपर्यंत ५५९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आज दिवसभरात चिंचवड आणि भोसरी येथीला ०७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.