Lockdown : पिंपरी-चिंचवडमधील 7 पोलिस तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या कारण

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अशा परिस्थिती पोलिसांवर बंदोबस्त करताना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. अशा परिस्थिती गैरहजर असलेल्या पोलिसांना तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. तरी देखील कामावर गैरहजर राहिलेल्या सात पोलिसांवर पिंपरी चिंचवड आयुक्त संदीप बिष्णोई यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस आयुक्तांनी 7 पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. आयुक्तांच्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी देण्यात आले आहेत.

एस. एच. रासकर (भोसरी), नलिनी पिंपळकर (तळेगाव एमआयडीसी), रतन कांबळे (एमआयडीसी भोसरी), विठ्ठल भगत (पिंपरी), डी. बी. कोकणे (निगडी), जगन्नाथ शिंदे (निगडी), एस. एस. जाधव (देहूरोड) अशी निलंबीत केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरनाचे रुग्ण आढळून येत असल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या पाहता केवळ तीन हजार पोलीस सध्या तैनात करण्यात आले आहेत. हे पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत असून त्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पोलिसांची संख्या अपुरी असल्याने कामाचे नियोजन करताना वरिष्ठांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, काहीजण जाणीवपूर्वक टाळाटाळ करून गैरहजर राहिले असल्याचे लक्षात आल्याने पोलीस आयुक्तांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.