पिंपरी महापालिकेचे YES बँकेत अडकलेले 984 कोटी 2 दिवसात मिळणार : श्रीरंग बारणे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कररुपी गोळा झालेले तब्बल ९८४.२६ कोटी रुपये खासगी क्षेत्रातील येस बँकेत अडकले आहेत. त्यामुळे महापालिकेचे पैसे तातडीने देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची आज (मंगळवारी) भेट घेऊन केली. त्यावर बँकेवरील निर्बंध उठविण्यात येणार असून दोन दिवसात पिंपरी चिंचवड महापालिकेचे पैसे मिळतील असे आश्वासन ठाकूर यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

येस बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) येस बँकवर गुरुवारी (दि.५ मार्च) निर्बंध लागू केले आहेत. प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या निर्बंधांमुळे पिंपरी महापालिकेचे कररुपातून गोळा झालेले तब्बल ९८४.२६ कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज संसद भवनात केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. महापालिकेचे अडकलेले पैसे तातडीने देण्याची विनंती केली.

खासदार बारणे म्हणाले, येस बँक देशातील सर्वांत मोठी खासगी बँक आहे. या बँकेवर निर्बंध आल्याने प्रशासक नेमला आहे. बँकेतील पैसे काढण्यावर बंधने घातली आहेत. केवळ ५० हजार रुपयेच काढता येत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड महापालिकेचे देखील तब्बल ९८४.२६ कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. जनतेच्या करातून जमा झालेला हा पैसा आहे. त्यामुळे महापालिकेचे पैसे तातडीने अदा करण्याचे निर्देश आरबीआयला देण्याची विनंती केली. त्यावर बँकेवरील निर्बंध उठविण्यात येणार आहेत. दोन दिवसात पिंपरी महापालिकेचे पैसे मिळतील. तुम्ही निश्चित रहा असे आश्वासन अर्थराज्यमंत्री ठाकूर यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.