Pimpri : अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी आलेल्या पोलिस उपनिरीक्षकास चिखलीत मारहाण

पिंपरी : दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील वॉरंट बजावण्यासाठी आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला चिखलीत महिला व आरोपीने मारहाण करण्याचा प्रकार घडला. तर त्यांच्या सहकार्‍याच्या डोळ्यात मिरची पुड टाकण्यात आली़.

याप्रकरणी चिखली पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून संदीप रामदास साबळे (रा. रामदासनगर, चिखली) याला अटक केली आहे. तर, सुनिता संदीप साबळे आणि सरिता दीपक साबळे या दोघा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी नरेंदर नंदलाल सहरावत (वय ३९़ रा. नवी दिल्ली) यांनी चिखली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहरावत हे पार्लमेंट पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. दीपक साबळे याच्याविरुद्ध गेल्या वर्षी ४२०, ४६७, ४७१, १२० (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटीयाला हाऊस कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी सहरावत हे बुधवारी दुपारी चिखली येथील रामदासनगर येथे गेले होते. त्यावेळी आरोपी दीपक साबळे याच्याविषयी काहीही माहिती न देता़ घराचे लोखंडी गेट अचानकपणे जोरात ओढल्याने सहरावत यांची बोटे लोखंडी गेटमध्ये अडकवली. त्यांच्या डाव्या हाताची बोटे पिरगाळून, डोक्यात बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचे सहकारी संजीव यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांनी संदीप साबळे याला अटक केली असून इतर दोघा महिलांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहे.