पिंपरी : नळाला पाणी आले का पाहण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  नळाला पाणी आले का हे पाहण्यासाठी रात्री घराबाहेर आलेल्या महिलेला पकडून जबरदस्तीने ऊसाच्या शेतात नेण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. तसेच ही घटना कोणाला सांगून नये, म्हणून त्याच्या भावाने व त्याच्या साथीदाराने या महिलेला व तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मरकळ येथील गोडसे मळा येथे गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडला.

याप्रकरणी आळंदी पोलिसांनी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ३२ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडसेमळा येथे घरासमोर असलेल्या नळाला पाणी आले आहे का हे पाहण्यासाठी महिला रात्री घराबाहेर आली होती. त्यावेळी शेजारी राहणार्‍या तरुणाने फिर्यादीला पाहून तिचा हात धरुन जवळ ओढून मिठी मारली.

माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला आवडतेस, माझेसोबत चल, असे म्हणून तिच्याबरोबर लज्जास्पद कृत्य करुन तिला शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात जबरदस्तीने ओढून घेऊन जाऊ लागला. त्यावर या महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून फिर्यादीचे सासरे व मुलगा धावत बाहेर आले. त्यांना पाहून हा तरुण पळून गेला. त्यानंतर लगेचच त्याचा भाऊ व एक साथीदार तेथे आला. तो फिर्यादीचे सासरे व मुलगा शिवीगाळ करु लागला. तुम्ही या गोष्टीची कोठेही वाच्यता करु नका नाही तर तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या महिलेने आळंदी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे.