पिंपरी चिंचवड शहरात दुकाने चालू ठेवणाऱ्या 58 जणांवर गुन्हे दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही पिंपरी चिंचवड शहरात दुकाने चालू असल्याचे समोर आले आहे. शहरातील ५८ जणांवर पोलिसांनी कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. त्याच बरोबर ही कारवाई अधिक करण्यासाठी शहरभर पथके तैनात करण्यात आलेली आहेत.

केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवरून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. गर्दीमधून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाकडे कानाडोळा करून शहरात काही ठिकाणी दुकाने गुरुवारी (१९ मार्च) सुरू होती. त्यामुळे हे दुकाने बंद करा अशा सूचना पोलिसांकडून दिल्या जात होत्या. तरीही दुकानात सुरू राहिल्याने दुपारी चार वाजेपर्यंत ५८ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, सर्व दुकाने, सर्व आस्थापना ३१ मार्च २०२० पर्यंत बंद राहतील.

अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. मात्र, जिलाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे कानाडोळा करून काही दुकानदार दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्या दुकानदारांना समजावण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहेत.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गर्दी टाळण्याबाबत कडक उपाय योजना करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कठोर कारवाई केली जात आहे. चिखली पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १६ दुकानचालकांवर तर अन्य ठिकाणी अशा एकूण ५८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.