पिंपरी : जेवणास उशीर झाल्याने कलाकार, क्रु मेंबरचा हॉटेलमध्ये धुमाकुळ; तोडफोड करीत तरुणीचा केला विनयभंग

पिंपरी : शुटींगसाठी आलेल्या इमे इंटरटेंमेंट अ‍ँड मोशन पिक्चरकडील स्टाफ व कर्मचार्‍यांनी जेवणास उशीर झाल्याने हॉटेलमध्ये धुमाकुळ घालून तोडफोड केली. तसेच तेथील एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी १८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सलमान मोहम्मद अक्रम खान (वय २४, रा. घाटकोपर वेस्ट), अनिल गुप्ता (वय ४२, रा. नालासोपारा इस्ट, ठाणे), धर्मेद्र कुमार (वय २८, रा. भाइंदर वेस्ट, ठाणे), सूर्यकांत साहु (वय ३१, रा. साकीनाका, मुंबई), अनिल पराडकर (वय ३९, रा. आरे कॉलनी), गौतम शर्मा (वय ४२, रा. खबरिया, बिहार), सुहास रंजन (वय ५१, रा. फत्तेबाद, बिहार), कुलदीप विश्वकर्मा (वय ३३, रा. गिरीहीड, झारखंड), राजकुमार यादव (वय ४०, रा.गिरीडीह, बिहार), बालु शाहु (वय ४०, रा. घाटकोपर वेस्ट), भानुप्रताप सिंग (वय ३०, रा. पतारिहा, गढवा, झारखंड), प्रतिक पवार (वय २७, रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश), विजय यादव (वय २३, रा. खार वेस्ट) आणि इतर ५ ते ६ अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

इमे इंटरटेंमेंट अँड मोशन पिक्चर या कंपनीकडील स्टाफ व कर्मचारी शुटींगसाठी पुण्यात आले असून ते हिंजवडीतील ओये टाऊनहाऊस हॉटेलमध्ये उतरले होते. २८ मार्च रोजी रात्री हॉटेलमधील वेटर श्रीदेश बोंडे व आयान शेख यांच्या कडे सलमान खान याला जेवण देण्यास उशीर झाला. या कारणावरुन त्याने बोंडे यांना शिवीगाळ करुन हॉटेलमधील चिनी मातीची प्लेट हातावर मारुन जखमी केले. त्यानंतर जेवणासाठी हजर असलेल्या इतर १३ जणांनी एकत्रित येऊन डायनिंग हॉलमधील १६ डिनर प्लेट तोडल्या. ११ खुर्च्या तोडल्या. त्यानंतर खाली जाऊन हॉटेलमधील दोन रुममधील बाथरुमच्या काचा फोडल्या. दोन्ही रुममधील ८ पिलो कव्हर्स ४ बेडशिट फाडल्या. हॉटेल मॅनेजर व इतरांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी हॉटेलमधील इतर रुममध्ये जाऊन सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान केले.

हॉटेलमधील हाऊस कीपर शाहरुख काझी व धुव्रा प्रसाद यांना सलमान खान याने मारहाण केली. तसेच सुहास रंजन याने तेथे काम करणार्‍या तरुणीकडे पाहून लैगिंक इशारे करुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ अधिक तपास करीत आहेत.