बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर फोडले ; सात लाखाची रोकड चोरली 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारुन चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कापून त्यातील पावणेसात लाख रुपयांची रोकड चोरून नेली.

हा प्रकार पिंपळे गुरव येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत घडला. याप्रकरणी जगदीश सुरेश गणेशकर (33, रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पिंपळे-गुरव येथील नावेचा रोड, ओम मेडीकल शेजारी बँक ऑफ इंडीयाचे एटीएम सेंटर आहे. 18 फेब्रुवारी दुपारी चार ते 20 फेब्रुवारी दुपारी एकच्या दरम्यान चोरट्यांनी एटीएम सेंटरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारुन फुटेज बंद केले. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कापून आतील एकूण 6 लाख 75 हजार 700 रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरुन नेली. तपास सांगवी पोलिस करत आहेत.