पिंपरीत तरूणावर तलवारीने वार, पाच जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ‘तरुणीकडे पाहून का हसत होता, तिची छेड काढतो का’, असे म्हणत तरुणाला मारहाण करत त्याच्यावर तलवारीने वार करण्यात आले. गुरुवारी (१९ मार्च) दुपारी साडे पाचच्या सुमारास पिंपरी येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
हॅप्पी सुरेंद्र सिंग संधू (२६), बॉबी सुरेंद्र सिंग संधू (२२), रखबीर उर्फ रोमी निशांत सिंधी (४५, तिघे रा. शगुन चौक, पिंपरी), आकाश उर्फ जग्या अशोक पिंधे (३७, रा. लिंक रोड, पत्राशेड), अस्पित अरफान साहली (२०, रा. काळेवाडी, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह काळ्या पाजी (रा. शगुन चौक, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश विष्णू साळवे (२५, रा. मिलिंद नगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळवे गुरुवारी दुपारी साडे पाचच्या सुमारास पिंपरी भाजी मंडई येथील वाहन पार्किंग समोर थांबले होते. त्यावेळी आरोपी बॉबी आणि अस्पीत बुलेटवर आले. ‘तुझ्याकडे काम आहे, आमच्या सोबत चल असे म्हणत साळवे यांना बुलेटवर बसवून लिंक रोड येथील वखारी जवळ एका कंस्ट्रक्शन साइटमध्ये घेऊन गेले. तिथे अगोदरपासून असलेल्या जग्या याने साळवेला उतरताच ‘ट्विंकलकडे पाहून का हसत होता, तिची छेड काढतो का,’ असे म्हणत तिघांनी साळवेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

अस्पीत याने लोखंडी रॉडने, जग्या याने लाकडी दांडक्याने पाठीवर मारहाण केली. त्यावेळी हॅपी सिंग तिथे आला. त्याने साळवेच्या डोक्यात तलवारीने दोन वेळा मारून जखमी केले. यानंतर सर्व आरोपी साळवेला तिथेच सोडून निघून गेले. साळवेचे वडील विष्णू साळवे आणि लहान भावाला देखील आरोपी रोमी सिंधी, काळ्या पाजी, हॅपी संधू, बॉबी संधू, अस्पीत, जग्या यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.