रिक्षात प्रवाशी भरण्याच्या वादातून चालकावर तलवारीने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – रिक्षा चालकांमध्ये झालेल्या प्रवासी भरण्याच्या वादातून तिघांनी एका रिक्षाचालकावर तलवारीने वार करुन जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 10) रात्री पावणे अकराच्या सुमारास काळेवाडी फाटा येथील रिक्षा स्टँडवर घडली.

सूरज चंदनशिवे हा जखमी झाला आहे. तर स्वप्नील नागनाथ चंदनशिवे (21, रा. रहाटणी) याने फिर्याद दिली आहे. तर पंकज पाचपिंडे, सोन्या पाचपिंडे (दोघे रा. रहाटणी) आणि त्यांच्या एकाच साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि सूरज हे रिक्षाचालक आहेत. शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास काळेवाडी फाटा येथील रिक्षा स्टँडवर प्रवासी भरण्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादाच्या कारणावरून आरोपींनी संगणमत करून सूरज चंदनशिवे याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी सोन्या आणि पंकज यांनी रिक्षातील तलवार काढून सूरजच्या डोक्यावर वार केले. यामध्ये सूरज गंभीर जखमी झाला. तपास वाकड पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –