बंदुकीचा धाक दाखवत बारबालाकडे सेक्सची मागणी, एकाला अटक 

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – दोन तरुणांनी बंदुकीचा धाक दाखवत बारबालाकडे सेक्सची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील वडगाव मावळ पोलिस स्टेशनमध्ये एका बारबालेने याबाबत तक्रार नोंदवली आहे. डान्स बारमध्ये छमछम सुरु झाल्यानंतर आता बंदुकीचा धाक दाखवत बारबालेकडे सेक्सची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकाला अटकही झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यात पीडितेसह आणखी ४ बारबालांचा समावेश आहे. पीडितेसह इतर चार बारबालांनी यातून आपली कशीतरी सुटका करून घेतली. पोलिसांत धाव घेत या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. यानंतर या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शरद वीर असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

सदर बारबाला या पनवेलच्या डान्स बारमधील असून काल या बारबाला पुण्यात आल्या होत्या. काही तरुणांनी एका बारबालेशी संपर्क साधून चौघींना घेऊन येण्याची मागणी केली. ठरल्याप्रमाणे आलेल्या चार बारबालांना घेऊन हे तरुण मावळ तालुक्यातील फळणे गावात गेले. या गावातील एका फार्म हाऊसवरच नाचगाण्याचा कार्यक्रम सुरु झाला. सुरु असलेल्या छमछमच्या तालावर डान्सचा आनंद घेत तरुणांनी दारुच्या बाटल्या रिचवल्या. या तरुणांपैकी के के उर्फ कैलास कुंजीर नावाच्या तरुणाने एका बारबालेला दारु पाजली आणि नंतर तो तिच्याकडे सेक्सची मागणी करू लागला. यानंतर त्या बारबालेने मात्र यासाठी त्याला नकार दिला. यानंतर त्याने मात्र तिला बंदुकीचा धाक दाखवण्यास सुरुवात केली.

यानंतर मात्र त्या बारबालांनी कसाबसा आपला जीव वाचवत सदर फार्म हाऊसवरून पळ काढत आपली सुटका करू घेतली. तरुणांनी त्यांचा पाठलाग करण्यापूर्वीच त्या गावातील मंदिरात लपून बसल्या. गावातील लोकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर गावातील लोकांनी पोलिसांना पाचारण केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

बारबालांनी याबाबत घडला प्रकार सांगत तक्रार दाखल केली यानंतर मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत शरद वीरला अटक केली. तर के के म्हणजेच कैलास कुंजीर हा अद्याप पोलिसांच्या तावडीत आला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हे तरुण पिंपरी-चिंचवड भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.