Pimpri : भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुंडलिक वाणी यांचं 74 व्या वर्षी निधन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते व पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक वसंतराव पुंडलिक वाणी (वय 74) यांचे आज रात्री पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना कोरोनाचाही संसर्ग झाला होता.

त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते 1986 मध्ये निवडून आले होते. भाजपचे ते जुने कार्यकर्ते होते. भाजपच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांशी त्यांचा वैयक्तिक परिचय व संबंध होता. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस व शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. मध्यंतरी काही काळ पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व पुढे प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली होती. एक उत्तम संघटक अशी त्यांची ख्याती होती.

पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय-धोरणांबाबत मतभेद झाल्यानंतर ते परत भाजपमध्ये स्वगृही परतले होते. भाजपने त्यांची प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. पुढे प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते गेली काही वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर होते.