पिंपरी : प्रेयसीच्या खुनाच्या संशयावरुन प्रियकराला 10 वर्षानंतर अटक; सध्या विकत होता भाजी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेम संबंधातून लग्न करण्यासाठी पळवून नेल्यानंतर तिच्याबरोबर लग्न न करता व तिचा खुन केल्याच्या संशयावरुन पिपंरी पोलिसांनी एकाला तब्बल १० वर्षानंतर अटक केली आहे. किशोर लक्ष्मण घारे (वय ३२, रा. डोणे, ता़ मावळ) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी सविता सत्यवान लांडगे (वय ५२, रा. बलदेवनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

लांडगे या धुणी-भांड्यांचे काम करतात. त्यांची 22 वर्षाची मुलगी सुमारे १० वर्षापूर्वी हिंजवडी येथील कंपनीमध्ये कामाला होती. तेथे तिचे किशोर घारे याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. ते लग्न करणार होते. त्यानंतर ११ सप्टेंबर २०११ रोजी घारे हा त्यांच्या घरी आला व त्यांच्या मुलीला आपण लग्न करु, असे सांगून घेऊन गेला. त्यानंतर त्यांची मुलगी घरी आली नाही़ म्हणून लांडगे यांनी दोघांना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही. ते गावी गेले असल्याने मोबाईल रेंज नसल्याने फोन लागत नसेल, असे त्यांना वाटले. त्यानंतर काही दिवसांनी घारे याचा फोन लागला. तेव्हा त्याने तुमच्या मुलीबरोबर मी लग्न न केल्याने ती त्याच दिवशी सोडून निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर ती आज उद्या परत येईल म्हणून त्यांनी वाट पाहिली. पण ती न आल्याने लाडंगे यांनी मुलगी हरविल्याची तक्रार पिंपरी पोलीस ठाण्यात दिली.

आतापर्यंत लांडगे यांना त्यांच्या मुलीचा शोध लागू शकला नाही. तसेच घारे याच्याशीही संपर्क होत नव्हता. पोलिसांनीही मुलीचा शोध घेतला नाही. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी घारे हा मारुंजी येथे भाजी विक्री करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी मारुंजी येथे जाऊन घारे याच्याकडे त्यांच्या मुलीबाबत विचारपूस केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा त्यांनी पिपंरी पोलिसांकडे धाव घेतली. किशोर घारे याने त्यांच्या मुलीला कोठे तरी नेऊन तिला जीवे ठार मारल्याची तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन किशोर घारे याला अटक केली आहे. त्याने त्याच्या प्रेयसीचे नेमके काय केले याची पोलीस चौकशी करीत आहेत.