पिंपरी कॅम्प परिसर 2 दिवसांसाठी ‘लॉकडाऊन’ : मनपा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या नियमांचे पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्पातील दुकानात येणाऱ्या ग्राहकांकडून अटी-शर्तीचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे पिंपरी बाजारपेठ आजपासून दोन दिवस म्हणजेच गुरुवारपर्यंत पुन्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

पिंपरी कॅम्प परिसरातील मुख्य बाजारपेठ, शगुन चौक, कराची चौक, साई चौक, आर्य समाज चौक, गेलार्ड चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक या परिसरातील बाजारपेठ आजपासून 25 जून 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असा आदेश महापालिका ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांनी काढला आहे.

सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, सम-विषम तारखेनुसार दुकाने सुरू ठेवावे, गर्दी टाळावी या अटीनुसार पिंपरी कॅम्पातील दुकाने उघडण्यास महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र, कोणीही नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमत आहेत. सामाजिक अंतराचे पालन होत नाही. फेसमास्कचा वापर केला जात नाही. सम-विषम तारखांनुसार दुकाने सुरु ठेवण्याच्या निमयाचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये करोनाचे संक्रमण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्प व परिसर बंद ठेवण्यात आला आहे.