पिंपरी : कोट्यावधी ड्रग्स प्रकरणात 85 लाखांची रोकड जप्त, आणखी नऊ आरोपी अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवडच्या आमली पदार्थ विरोधी पथकाने उघडकीस आणलेल्या ड्रग्स रॅकेट मध्ये आणखी 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 85 लाख रुपयांची रोकड आणि 75 लाख रुपयांच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 ऑक्टोबर रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाने 20 किलो एमडी मेफेड्रोन हे 20 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहा तपास पथकांची स्थापना केली. यामध्ये पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उपनिरीक्षक चामले यांची पथके स्थापन करून तपास सुरू केला आहे.

या पथकांनी प्रथम किरण राजगुरू, अशोक संकपाळ, किरण काळे या आरोपींना अटक करून या गुन्ह्यातील एम डी ड्रग हे रांजणगाव येथे संयोग बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये बनवले होते ते उघड केले. त्या ठिकाणी ड्रग बनवण्याच्या मशिनरीसह कंपनी सील करण्यात आली आहे. प्रमुख सूत्रधार असलेले तुषार सूर्यकांत काळे राहणार बोरवली व राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी रा वसई यांना मुंबई येथून अटक केली. तसेच नायजेरियन झुबी इफनेयी उडोको यालाही अटक केली. राकेश खांनिवडेकर उर्फ रॉकी याचा एनसीबी ची पथके शोधत आहेत.

अक्षय काळे ,चेतन दंडवते, आनंदगिर गोसावी यांनी डिसेंबर 2019 मध्ये तुषार सूर्यकांत काळे, किरण राजगुरू, कुलदीप इंदलकर, ऋषिकेश मिश्रा, जुबेर मुल्ला यांच्या मदतीने रांजणगाव एमआयडीसीमधील संयोग बायोटेक लिमिटेड या बंद असलेल्या कंपनीमध्ये सुमारे 132 किलो एम डी ड्रग बनवले होते. त्यापैकी 112 किलो एम डी ड्रग हे तुषार काळे याने यापूर्वीच नेऊन त्याची बाजारात विक्री केली आहे. 20 किलो ड्रग हे अक्षय काळे याने आपल्या घरी ठेवले होते. त्याची विक्री करीता घेऊन जात असताना चाकण शिक्रापूर रोडवर अमली पदार्थ विरोधी पथकाच्या हाती लागला होता.

रांजणगाव एमआयडीसीमधील एका दुसऱ्या कंपनीमध्ये संचालक म्हणून काम करणारा किरण काळे यांनी याकामी अक्षय काळे, चेतन दंडवते व आनंद गिरी गोसावी, किरण राजगुरू व तुषार काळे यांना अशोक सपकाळ यांची बंद पडलेली कंपनी एम डी ड्रग बनविणे साठी उपलब्ध करून दिली. त्यासाठी किरण काळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या कार्यालयात वरील सर्वांची मीटिंग घेऊन एमडी ड्रग बनवण्यासाठी 60 हजार रुपये प्रति किलो असा दर ठरवून दिला होता. तुषार काळे याने त्याबदल्यात एकूण 67 लाख रुपये त्यांना यापूर्वी दिलेले आहेत. सर्व आरोपीत यांचे बँक अकाऊंट फ्रिज केलेले आहेत तसेच त्यांनी सदरचे पैशांमधुन विकत घेतली आहे किंवा कसे याबाबत संबंधीत विभागाकडे पत्रव्यवहार करुन माहिती मागविलेली आहे.

छोटा राजन गँगशी संबंधित असलेला तुषार सूर्यकांत काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार कायद्याचे एकुण 08 गुन्हे त्याचेवर दाखल आहेत. त्याने रांजणगाव एम आई डी सी मध्ये संयोग बायोटेक मध्ये बनवलेला 132 किलो एमडी ड्रग पैकी 112 किलो ड्रग पुढे नायगाव वसई येथे राहणाऱ्या जुबी उकोडो नावाच्या नायजेरियन नागरिकाला विकला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तुषार काळे याला आरोपी राकेश खानिवडे कर यांने विक्री कामी, बनविणे कामी व त्यातील पैशाच्या विल्हेवाट लावण्यासाठी मदत केलेली आहे.

राकेश खानिवडेकर हा सुद्धा एमडी ड्रग चा रॅकेटमधील प्रमुख सूत्रधार असून यापूर्वी त्याला डी आर आय च्या अधिकाऱ्यांनी पालघर येथील एका कंपनीत अमली पदार्थ बनवण्याच्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेली आहे.
तुषार काळे व राकेश खनिवडेकर यांच्याकडून अनुक्रमे 60 लाख रुपये व 25 लाख रुपये अशी एकूण 85 लाख रुपये ड्रग विक्री करून आलेल्या रकमपैकी काही रक्कम जप्त केलेली आहे. तसेच तुषार काळे याने मौजे पालसाई ता वाडा जिल्हा पालघर येथे 75 लाख रुपये किमतीची दोन एकर जागा विकत घेतल्याचे दस्तऐवज प्राप्त झाले असून सदरची शेत जमीन ही ड्रग विक्रीच्या पैशातून घेतली असल्याने ती मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू आहे सदर जमिनीवर तुषार काळे स्वतः एक फॅक्टरी टाकनेची तयारी करत आसलेचे दिसून आले आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, गुन्हे शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, अंबरीश देशमुख, प्रशांत महाले, पोलीस उपनिरीक्षक चामले, काळुराम लांडगे व पोलीस कर्मचारी शाकिर जिनेडी, राजन महाडीक, राजेंद्र बांबळे, प्रदिप शेलार, शकुर तांबोळी, मयुर वाडकर, स्वामिनाथ जाधव, धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, दिनकर भुजबळ, फारुक मुल्ला, गणेश मालुसरे, संतोष दिघे, संदिप पाटिल, संदिप ठाकरे, प्रसाद कलाटे, श्यामसुंदर गुट्टे, शैलेश मगर, नितीन बहिरट, प्रसाद जंगीलवाड, सावन राठोड, ज्ञानेश्वर गाडेकर, राजकुमार इघारे, अशोक गारगोटे, अजित कुटे, प्रविण कांबळे, दयानंद खेडकर, दादा धस, गोपाळ ब्रम्हांदे, धनंजय भोसले, भरत माने, प्रदिप गुट्टे, पांडुरंग फुंदे व अनिता यादव या पथकाने केली आहे.