Pimpri : भाड्याने कार घेऊन अनेकांची फसवणूक

पिंपरी : भाड्याने कार घेऊन त्याचे पैसे न देता कारही गायब करुन अनेकांची फसवणूक करण्याचा प्रकार चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नमन सहाणी (वय ३९, रा. लोहगाव) आणि कल्पेश अनिल पंगेरकर (वय ३३, रा. नवी खडकी, येरवडा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी सुनिल नामदेव राखपसरे (वय २९, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सुनिल राखपसरे यांनी २ फेब्रुवारी रोजी सहाणी आणि पंगेरकर यांना आपली मारुती सुझुकी इर्टिगा ही कार भाड्याने दिली होती. त्याबाबतचा करारही त्यांनी केला होता. परंतु, त्यानंतर अद्याप त्यांनी भाड्याचे १ लाख ३५ हजार रुपये दिले नाहीत. तसेच त्यांनी कार वारंवार परत मागितली असता त्यांनी फिर्यादी यांना आम्ही गाडी परत देणार नाही़ तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणून दमदाटी केली. या दोघांनी अशाच प्रकारे करार करुन अनेकांकडून गाड्या भाड्याने घेतल्या आहेत. मात्र, त्यांनी भाडेही दिले नाही आणि कारही परत केलेल्या नाहीत. सहायक पोलीस निरीक्षक ठुबल अधिक तपास करीत आहेत.