पिंपरी : 48 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट कागदपत्रे तयार करुन बँकेकडून ४८ लाख रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड येथे घडली.
नरेश जगन्नाथ भंडारी (३६, रा. मांजरी खुर्द), गणेश नामदेव गोडसे, अमृता गणेश गोडसे (रा. गव्हाणे आळी, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमितआंशु गोविंदशाह कुमार (३५, रा. पिंपळनिलख) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भोसरी गावातील एका फ्लॅट खरेदीचा एकनाथ येळवंडे यांच्यासोबत करार केले. त्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून त्या फ्लॅटवर कर्ज काढण्यासाठी फ्लॅटचे बनावट खरेदी करार, बिल्डरचे बनावट डिमांड लेटर, एनओसी तयार करून ती फिर्यादी यांच्या साऊथ इंडियन बँकेत खरी असल्याचे भासवले. गणेश आणि अमृता गोडसे या दोघांच्या नावावर ४८ लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्या रकमेच्या अपहार केला.

हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी यांनी या प्रकरणाचा बँकेतील पॅनल मार्फत चौकशी करून फसवणुकीची खात्री झाल्यानंतर १८ मार्चला फिर्याद दिली आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.