Paytm KYC ची मुदत संपल्याचे सांगून फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पेटीएम कार्यालयातून बोलत असून तुमच्या केवायसीची मुदत संपली आहे असे सांगून, डेबीट आणि क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती विचारून, त्याद्वारे सव्वालाखांची फसवणूक केली. हा प्रकार देहूरोड येथे नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी सुरेश गोरोबा साबळे ( 52, रा. मुक्ताई चौक, किवळे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8927756438 या मोबाईल क्रमांकावरून बोलणारा संतोष पाशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबळे यांना आरोपीने तुमच्या पेटीएम केवायसीची मुंदत संपल्याचा संदेश पाठवून 8927756438 या क्रमांकावर संपर्क साधण्याचा सांगितले. फिर्यादी यांनी 8927756438 या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आरोपीने मी पेटीएमच्या उत्तरप्रदेशातील नोएडा कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. तुमच्या पेटीएम केवायसीची मुदत संपली असून नव्याने केवायसी करण्यासाठी डेबीट कार्डची माहिती मागितली.

त्यानंतर एक लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्यास सांगितली. क्युएस कोड आल्यानंतर अ‍ॅलाव्ह करण्यास सांगून त्याद्वारे त्यांच्या खात्यातून तीन वेळा 9 हजार 898 रूपये कट झाले. फिर्यादी यांनी आरोपीला पैसे कट झाल्याचे सांगितल्यानंतर चुकून पैसे कट झाले असून दुसर्‍या क्रेडीट कार्डची माहिती विचारली. त्यावरूनही आरोपीने 99 हजार 999 रूपये काढून घेत फिर्यादी यांची एकूण 1 लाख 29 हजार 693 रूपयांची फसवणूक केली आहे.