अधिकारी व ठाण्यातील घडामोडींवर ‘नायका’चा वॉच

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पोलीस खात्यामध्ये चांगल्या ठिकाणी ‘पोस्टिंग’ मिळण्यासाठी अधिकारी सर्वपरीने प्रयत्न करतात. ‘पोस्टिंग’ मिळाल्यानंतर आता पुढील दोन वर्षे आपलेच राज्य असेच राहतात आणि बहुतांश होतेही तसेच. यामुळे त्या हद्दीत जसा अधिकारी तसे वातावरण तयार होते. मात्र या सगळ्या गोष्टीना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात यापुढे थारा नसणार आहे. कारण पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी एक अनोखी मोहीम सुरु केली आहे. ज्या पोलीस ठाण्यात अनागोंदी कारभार सुरू आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आता पोलीस ठाण्याचा एक दिवसाचा कारभार दुसऱ्या अधिकाऱ्यांना देऊन एक दिवसाचा ‘नायक’ बनविले जाणार आहे.

पुणे आणि पुणे ग्रामीण पोलीस यांच्यामधून भाग कमी करून स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाले. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे आर.के. पद्मनाभन यांनी घेतली. कमी मनुष्यबळ, अपुरे वाहने, कोणतीही उपलब्ध नसलेली साधनसामग्री यातून मार्ग काढत पोलीस आयुक्तालय सुरु झाले. या पंधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वी काम केलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी आयुक्तालयात वर्णी लावण्यासाठी सर्वपरीने हालचाली केल्या. यातील काहींना त्यांच्या प्रयतांना यश आले. आयुक्तलयात आल्यानंतर पुन्हा चांगल्या ठिकाणी ‘पोस्टिंग’ मिळावे यासाठी प्रयत्न सुरु झाले. पोलीस आयुक्तांनी बदल्या केल्या आणि अनेकांच्या आशा मावळल्या. पोलीस आयुक्तांनी कामात हलगर्जीपणा तसेच कामात तरबेज नसणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली. वारंवार बदल्या करुन कोणीही आपले साम्राज्य प्रस्थापित करू शकत नाही याचा संदेश दिला. लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर अनेक बदल्या केल्या. यानंतर आयुक्तांनी ही अनोखी मोहीम सुरु केली आहे.

नायक सिनेमा प्रमाणे एक दिवसाचा कारभारी म्हणून दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याला त्या पोलीस ठाणे किंवा पदाचा हक्क दिले जाणार आहेत. यामध्ये त्या दिवसाची क्राईम डायरी, सर्व घडणाऱ्या घडामोडी यावर ‘तो’ अधिकारी निर्णय घेणार तसेच हद्दीत सुरु असणाऱ्या सर्व अवैध धंद्यावर कारवाई करणार आहेत. आणि त्या दिवसाच्या सर्व घडामोडीचा आढावा थेट पोलीस आयुक्तांना दिला जाणार आहे. यामुळे अनेक अधिकाऱ्यांना एक दिवसाचा नायक होण्याचा मान मिळणार आहे. त्या ‘नायक’च्या अहवालानंतर पोलीस आयुक्त पुढील मोहीम ठरवणार आहेत.

या अनोख्या मोहिमेमुळे प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परस्पर सुरु असणारे सर्व प्रकार समोर येण्यास मदत होणार आहे. याबाबत पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांना विचारले असता, पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व सुरळीत सुरु आहे का हे पाहण्यासाठी एक दिवसासाठी दुसऱ्या अधिकाऱ्याला नेमले जाणार आहे. त्या दिवशी पूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार त्या अधिकाऱ्याला असणार आहेत. यामुळे अनेक गोष्टी समजण्यास मदत होईल.

Loading...
You might also like