पिंपरी : खेळताना गॅलरीतून पडून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – इमारतीच्या सातव्या मजल्यावरील गॅलरीत खेळताना अचानक तोल जाऊन खाली पडल्याने एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. पिंपरी येथे बुधवारी (दि. 24) दुपारी चार वाजता ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

अथर्व दीपक गावडे (वय 12) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील कोहिनूर शांग्रिला इमारतीच्या सातव्या मजल्यावर गावडे कुटुंब राहते. अथर्व हा बुधवारी दुपारी त्याच्या सहा वर्षीय भावासोबत गॅलरीत खेळत होता. तर त्याची आई घरकामात व्यस्त होती. भावासोबत खेळता-खेळता अथर्व गॅलरीवर चढला. गॅलरीतून तो खाली डोकावून पाहत होता, त्याच वेळी त्याचा तोल गेला आणि तो थेट खाली पडला. त्यानंतर लहान भावाने रडत जाऊन आईला हा प्रकार सांगितला. तेंव्हा ही घटना लक्षात येताच अर्थवला जखमी अवस्थेत तातडीने महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.