Coronavirus : चिंताजनक ! पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे विक्रमी 171 नवे पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 2000 वर

पिंपरी /पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी एका दिवसात विक्रमी रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी तब्बल 171 रुग्ण आढळून आले असून पिंपरी चिचंवडकरांचा धोका वाढला आहे. आज आढळून आलेल्या 171 रुग्णांमुळे पिंपरी चिंचवडमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2034 इतकी झाली आहे. आज एकूण 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये पिंपरी चिंचवड हद्दीतील दोन तर हद्दी बाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. आज आढळून आलेल्या 171 रुग्णंमध्ये 102 पुरुष तर 69 महिलांचा समावेश असून 76 रुग्ण हे हद्दी बाहेरील आहेत.

कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची दुसरी चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने 127 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 2034 रुग्णांपैकी 1197 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एकूण 60 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये 35 पिंपरी चिंचवड हद्दीतील असून 25 हद्दी बाहेरील रुग्ण आहेत. आज मृत्यू झालेले रुग्ण पवारनगर जुनी सांगवी येथील 72 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील अजंठानगर मधील 47 वर्षीय पुरुष आणि कोथरूड येथील 47 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 69 महिलांसह एकूण 171 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय याखेरीज गणेशखंड, वारजे, बोपोडी, रास्ता पेठ, टिंगरेनगर विश्रांतवाडी, खडकी, कसबा पेठ, औंध, दौंड येथील सात महिलांसह 15 रूग्णांचे पॉझिटिव्ह चाचणी अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यांच्यासह इतर रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील 10 जणांवर पुण्यात उपचार सुरु आहेत.