पिंपरी चिंचवड शहरात 300 नवीन रुग्ण, 7 जणांचा मृत्यू तर 371 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. बुधवारी (दि.8) दिवसभरात 300 जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5493 इतकी झाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 10 रुग्ण शहराबाहेरील तर 290 शहरातील रुग्णांचा समावेश आहे. आज दिवसभरात 371 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 5 शहरातील आणि 2 शहराबाहेरील रुग्णांचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात 300 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहराबाहेरील 10 रुग्ण असून यांच्यासह 129 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. दिवसभरात 371 रुग्ण बरे झाले आहेत, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 3509 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या शहरामध्ये 1880 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बुधवारी 7 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची सख्या 111 झाली आहे. यात 77 शहरातील आणि 34 शहराबाहेरील रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड शहरात राहणारे आणि पुण्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 14 आहे. शहरामध्ये आज देहूरोड किवळे येथील 40 वर्षीय महिला, काळेवडी येथील 80 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती, चिखली घरकुल येथील 46 वर्षीय व्यक्ती, दापोडी येथील 36 वर्षीय व्यक्ती, पिंपरी गांधीनगर येथील 49 वर्षीय महिला, धुळे येथील 66 वर्षीय पुरुष, पुणे बावधन खुर्द येथील 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.