पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील एका पोलिस ठाण्यातील 6 अधिकारी-कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   पिंपरी चिंचवड पोलीस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. तीन दिवसांपूर्वी दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज एकाच पोलीस ठाण्यातील सहा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या 22 झाली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या देहूगाव येथून संत तुकाराम महाराज तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी बसने पंढरपूर येथे रवाना झाल्या. त्या पार्श्वभूमीवर पालखी सोबत रवाना होणाऱ्या पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, तसेच आणखी एका पोलीस निरीक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

दरम्यान या पोलीस निरीक्षकाच्या संपर्कात आलेल्यांची टेस्ट करण्यात आली, त्यावेळी एकाच पोलीस ठाण्यातील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर यासह सुरक्षा साधनांचा वापर करावा, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.