पिंपरी चिंचवड शहरात आज 8 नवीन पॉझिटिव्ह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरुवारी) नव्याने आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सहा महिन्याच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आजपर्यंत 164 जणांना कोरोनाची लागण झाली असून 65 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने बुधवारी (दि. 6) 76 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही आणि ‘नारी’कडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सायंकाळी आले आहेत. त्यामध्ये पिंपळे गुरव, खराळवाडी, तळवडे येथील चार जणांते रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. 15 वर्षाचा मुलगा, सहा महिन्याची मुलगी, 16 आणि 28 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रुपीनगर, थेरगाव येथील दोघे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचे 14 दिवसांचे आणि त्यानंतरच्या 24 तासाचे दोनही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिका रुग्णालयात 77 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील 62 आणि शहराबाहेरील 3 असे 65 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.