पिंपरीत 51%, चिंचवडला 53% तर भोसरीत 59 % मतदान ; टक्का घसरल्याने उमेदवारांची वाढली धाकधुक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात अत्यंत कमी टक्के मतदान झाल्यामुळे सर्वच उमेदवारांची चिंता वाढली आहे. पिंपरी विधानसभेत 51 टक्के चिंचवडमध्ये 53 टक्के आणि भोसरीत 59 टक्के एवढे सरासरी मतदान झाले.

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात आज (सोमवारी) सकाळी सात पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात पिंपरी मतदारसंघात 51 टक्के एवढे मतदान झाले आहे. चिंचवड विधानसभेत 53 टक्के मतदान झाले. तर भोसरीत विधानसभेत 59 टक्के एवढे मतदान झाले आहे.

पिंपरी मतदारसंघात 3 लाख 53 हजार 545, चिंचवड मतदारसंघात 5 लाख 18 हजार 309 मतदार तर भोसरी मतदारसंघात 4 लाख 41 हजार 125 मतदार आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीकडून अण्णा बनसोडे, भाजप बंडखोर बाळासाहेब ओव्हाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण गायकवाड यांच्यासह सर्वाधिक 18 जण पिंपरीत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चिंचवडमधून भाजपकडून लक्ष्मण जगताप, अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह 11 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, भोसरीत मतदारसंघातून भाजपचे महेश लांडगे आणि अपक्ष विलास लांडे यांच्यासह 12 उमेदवार आपले नशिब अजामावत आहेत. आज त्यांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. गुरूवारी दि.24 रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी दुपारपर्यंत निकाल जाहीर होणार आहे.

आज एकूण झालेले सरासरी मतदान

चिंचवड – 53 %
पिंपरी – 51 %
भोसरी – 59 %