पिंपरी-चिंचवडच्या कलाकारांची मातृदिना निमित्त विशेष कलाकृती “सांग ना गं आई”….. 

पिंपरी। पोलिसनामा ऑनलाइन

जागतिक ‘मातृदिना’च्या निमीत्ताने पिंपरी-चिंचवड मधील कलाकारांनी खास आई साठी समर्पित म्हणून एक विशेष गीत केले आहे. “सांग ना गं आई” असे या गीताचे नाव असुन पिंपरी-चिंचवड मधील रेझोनन्स स्टुडिअो आणि  iDreamz फिल्मक्राफ्ट यांनी या गीताची निर्मिती केली आहे. अनावरण सोहळा  चिंचवड येथे पार पडला, कार्यक्रमाला “दिल दोस्ती दुनियादारी” मधील आशू या भूमिकेतून चमकलेले तसेच “बापजन्म” या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते पुष्कराज चिरपुटकर हे विशेष अतिथी म्हणून लाभले होते. त्याशिवाय “फुंतरू” या चित्रपटाचे पुरस्कार विजेते संकलक बी मंहातेश्वर, “राधा ही बावरी” या मालिकेतून चमकलेले सुचेत गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुत्रसंचालन “डबल सीट”, “बारायण” या चित्रपटांतून झळकलेल्या अभिनेत्री रूपाली पाथरे यांनी केले.

आई नेहमीच आपल्या मुलांसाठी सतत राबत असते पण मुला-मुलींचे तिच्या कष्टांकडे दुर्लक्ष होते म्हणूनच गीतकार व निर्माता गणेश साबळे यांनी या गीताद्वारे आताच्या युवा पिढीला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. “सांग ना गं आई तुला काय हवे?” हा प्रश्न प्रत्येकाने आईला विचारला पाहिजे अर्थातच उत्तराने डोळे पाणावल्याखेरीज राहणार नाहीत. हे गीत अतिशय सुंदररीत्या संगीताच्या सुरांत गुंफलंय मराठी ब्रेथलेस फेम संगीतकार तेजस चव्हाण यांनी. यांच्या संगीताची जादू नेहमीच श्रोत्यांना भुरळ घालते, त्यात या गीताने आणखी एक भर पडली आहे. गीताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गीताला लाभलेला सुरेल आवाज.

गतवर्षी पार पडलेल्या मराठी सा रे ग म प या कार्यक्रमातून चमकलेले आणि स्पर्धेचे उपविजेते ठरलेले अक्षय घाणेकर यांनी या गीताचे गायन केले आहे. गणेश शिलवंत, रोहित वनकर या कलाकारांनी अनुक्रमे गिटार व बासुरीचे स्वर दिले आहेत.

हे गीत ऐकल्यावर ज्याप्रमाणे काळजाला भिडते त्याचप्रमाणे या गीताचा व्हिडियो देखील विचार करायला लावणारा आहे. हा सुंदर व्हिडीयो दिग्दर्शित केलाय नवोदित दिग्दर्शक आकाश थिटे यांनी. त्यांनी मांडलेली कथा, शुभम केदार यांचे छायाचित्रण, शुभम राऊत यांचे संकलन आणि नवोदित कलाकार रणजित कांबळे, उत्कर्ष कांबळे, नहुष अकोलकर यांच्या समवेत बारायण या चित्रपटातून व अनेक मराठी मालिकांतून चमकलेल्या रश्मी घाटपांडे व रूपाली पाथरे यांनी अभिनय केला आहे. याशिवाय सागर माने, राजस चव्हाण, अनिकेत घाडगे, सुरज वामन, प्रसाद वाडेकर, शार्दुल मांडे, प्रणिल साबळे, विशाल कालेकर, राहूल कचरे, निमेश हिरवे, सागर पांढरे हे गीत लोकांपर्यत पोहचवण्याचे काम करत आहे.

आई आपल्याला भरभरून देत असते आणि म्हणूनच आपण आईची काळजी घेतली पाहिजे. युवा पिढीने या गीताद्वारे दिलेला हा संदेश समजून घ्यावा व  रेझोनन्स टीमने आणखी नव नवीन कामे करून शहराचे नाव उज्ज्वल करावे अशी सदिच्छा पुष्कराज यांनी व्यक्त केली. हे गीत तुम्ही युट्यूबवर सांग ना गं आई हे नाव टाकून “रेझोनन्स स्टुडिअो” या युट्यूब चैनलवर पाहू शकता. आई ला समर्पित हे सुंदर गीत सर्वांनीच शेअर करून या गीताला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा असे आवाहन तेजस चव्हाण, गणेश साबळे आणि सुंदर कांबळे यांनी उपस्थितांना केले.