पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 24 पिस्तूल अन् 38 जिवंत काडतूसे जप्त

भोसरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून शहरात त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा भोसरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 24 पिस्टल आणि 38 जिवंत काडतुसे जप्त केली आहे.

बबलूसिंग उर्फ रॉनी अत्तरसिंग बरनाला (रा. उमर्टी, पो. बलवाडी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्य प्रदेश), कालू उर्फ सुशील मांगीलाल पावरा (रा. अंमलवाडी, ता. चोपडा, जि. जळगाव, मुळ रा. बडवाणी मध्यप्रदेश), रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (रा. भोसरी, मूळ रा. धूळे), उमेश अरुण रायरीकर (रा. गायकवाड वाडी, बहुली, ता. हवेली), बंटी उर्फ अक्षय राजू शळके (रा. मुंढवा, पुणे), धिरज अनिल ढिगारे (रा. हडपसर), दत्ता उर्फ महाराज सोनबा मरगळे (रा. पेरणे फाटा, मुळ रा. चीलोबा वस्ती, ता. दौंड), मॉन्टी संज्य भोथ उर्फ मॉन्टी वाल्मीकी (रा. नेहरुनगर पिंपरी), अमित बाळासाहेब दगडे (रा. बावधन), राहुल गुलाब वाल्हेकर (रा. भोर), संदीप अनंदा भुंडे (रा. बावधन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, भोसरी तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आरोपी रुपेश पाटील याला अटक केली. त्याच्याकडून चार पिस्तूल व चार काडतुसे जप्त केली. आरोपीने ते पिस्तूल मध्य प्रदेशातून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले. तेथील बडवाणी जिल्ह्यातील वरला तालुक्यातील बलवाडी, उमर्टी गावाजवळ जंगलात सापळा रचून पाठलाग करुन पिस्तुलाचा मुख्य डिलर आरोपी रॉनी बरनाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ पिस्तूल आणि वीस जिवंत काडतुसे जप्त केली. त्यानंतर रॉनीचा मध्य प्रदेशातील साथीदार कालू पावरा याला ताब्यात घेऊन दोन पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त केली. आरोपींनी पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी पिस्तूल पुरवठा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी इतर आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

शस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर

आरोपी मध्य प्रदेशातून पिस्तूलाचा पुरवठा करीत होते. त्यासाठी आरोपी रॉनी व कालू हे सोशल मीडियाद्वारे आरोपींना त्याचा संपर्क क्रमांक देत असत. तसेच अनेक गुन्हेगार येरवडा कारागृहात असताना आरोपी रॉनी व कालू यांचा संपर्क क्रमांक एकमेकांना देत होते. ‘मुळशी पॅटर्न’ प्रमाणे गुन्हे करणारे आरोपी नन्या रायरीकर तसेच राहुल वाल्हेकर, अमित दगडे, धिरज ढिगारे, बंटी शेळके यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत.

भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम, सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, समीर रासकर, गणेश सावंत, सुमीत देवकर, विनोद वीर, संतोष महाडीक आशिष गोपी यांच्या पथकाने केली.