‘पिंपरी चिंचवडमध्ये जनता कर्फ्यू नको, कडकडीत लॉकडाऊन करा’

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि महापौर यांनी केले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत पिंपरी चिंचवडमधील नागरीक अजूनही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांकडून प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. व्यापाऱ्यांनी देखील पालिका प्रशासनाने दिलेल्या सूचना न पाळता आपली दुकाने सुरु ठेवली आहेत. यामुळे जनता कर्फ्यू एवजी संपूर्ण शहर लॉकडाऊन करा असं मत शहरातील काही नागरिक आणि व्यापाऱ्यांचे आहे. लॉकडाऊनमध्ये शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात होती. मात्र लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत चालला आहे. त्यात मुंबई ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष केल्याचे पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून विनामास्क बाहेर पडू नये असे आवाहन केले असतानाही नागरिकांकडून मास्कचा वापर होताना दिसत नाही.

पिंपरी चिंचवडमध्ये नागरिक सर्रास रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अनेक दुकानं आणि व्यापार सुरु आहेत. ज्यामध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. यामुळे कोरोनाचा धोका अधिकच वाढत आहे. त्यामुळे पिंपरीतील अनेक नागरिकांनी कडकडीत लॉकडाऊन जाहीर करा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.