Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यातील परिस्थिती सुधारत असताना कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने लोक संक्रमीत होऊ लागले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आह. गेल्या 24 तासात शहरामध्ये 2563 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 54 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2563 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 88 हजार 588 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2206 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्य़ंत 1 लाख 62 हजार 870 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 23 हजार 274 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 54 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 32 रुग्ण शहरातील आहेत. तर 22 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3512 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2444 तर हद्दीबाहेरील 1068 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण चिंचवड, रहाटणी, भोसरी, रावेत, मोशी, किवळे, चिखली, वाकड, काळेवाडी, आकुर्डी, दापोडी, थेरगाव, फुगेवाडी, पिंपरी, सांगवी, पुनावळे, दिघी, पिंपळे गुरव, वाल्हेकरवाडी, निगडी, जुन्नर, पुणे, भवानी पेठ, हडपसर, बावधन, देहूरोड, लोहगांव, शिरुर, बोपोडी, खडकी, बिदर, वडगाव बुद्रुक, दत्तवाडी, नाशिक, सिंहगड रोड, येरवडा येथील रहिवाशी आहेत. पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आधी मृत झालेल्या केसेस आज कळवण्यात आल्याने मृत्यूची संख्या अधिक दिसून येत आहे. मागील 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.