Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2417 नवीन रुग्ण, 71 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यात पुणे जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यामध्ये असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. रुग्णांना आरोग्य सुविधा वेळेवर मिळाव्यात यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात देखील मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येसोबत मृतांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात 2417 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) दिवसभरात शहरात 2417 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 95 हजार 929 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1833 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 69 हजार 235 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 24 हजार 143 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 71 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 43 रुग्ण शहरातील आहेत. तर 28 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 692 वर पोहचली आहे. यामध्ये शहरातील 2551 तर हद्दीबाहेरील 1141 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले कासारवाडी, यमुनानगर, चिंचवड, भोसरी, पिंपळे गुरव, तळवडे, पिंपरी, रहाटणी, थेरगाव, पिंपळे निलख, मोशी, संत तुकारामनगर, चिखली, रुपीनगर, काळेवाडी, चऱ्होली, सांगवी, जाधववाडी, दापोडी, वाल्हेकरवाडी, वाकड, खेड, पुणे, खडकी, धानोरी, आंबेगाव, बारामती, वाघोली, वानवडी, पाषाण, विश्रांतवाडी, मुळशी, हाडपसर, जुन्नर, आळंदी, मणारी, कोंडवा, तळेगाव, बोपोडी, खडकी, वारजे, मालवणी, येरवडा येथील रहिवाशी आहेत. पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाने सांगितले की, आधी मृत्यू झालेल्या केसेस आज कळवण्यात आल्याने मृत्यूचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

प्रभाग निहाय आढळून आलेले रुग्ण

अ प्रभाग – 240, ब प्रभाग – 358, क प्रभाग – 233, ड प्रभाग – 445, इ प्रभाग – 361, फ प्रभाग – 228, ग प्रभाग – 308, ह प्रभाग – 244