Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2518 नवीन रुग्ण, 1315 जणांचा डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, मागील दोन दिवसांपासून नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. परंतु रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2518 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 67 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 2518 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 23 हजार 966 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1315 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 98 हजार 690 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 22 हजार 061 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 67 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 42 रुग्ण शहरातील आहेत. तर 25 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4844 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 3215 तर हद्दीबाहेरील 1629 रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या 2080 एवढी असून शहरातील 124 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आज मृत्यू झालेले रुग्ण चिंचवड, सांगवी, पिंपरी, निगडी, भोसरी, चऱ्होली, तळवडे, आकुर्डी, वाकड, संत तुकारामनगर, दिघी, मोशी, पिंपळे गुरव, काळेवाडी, कासारवाडी, फुगेवाडी, शाहू नगर, थेरगाव, प्राधिकरम, पिंपळे सौदागर, पाषाण, वडगाव, मरकळ, खेड, पुणे, नाशिक, खडकी, धनकवडी, औंध, घोरपडी, आंबेगाव, सिंहगड रोड, उंड्री, तळेगाव, फलटण, वडगाव बुद्रुक, बिबवेवाडी येथील रहिवाशी आहेत. पिंपरी चिंचवड आरोग्या विभागाने दिलेल्या माहीतीनुसार, आधी मृत्यू झालेल्या केसेस आज कळवण्यात आल्याने मृत्यूची संख्या वाढलेली आहे. मागील 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.