Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1109 नवीन रुग्ण, 1758 जणांचा डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पिंपरी चिंचवड शहरात संक्रमित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडला. मात्र, मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. आज शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 1109 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 1758 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 1109 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 39 हजार 861 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1768 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 15 हजार 686 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 20 हजार 613 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 77 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 46 रुग्ण शहरातील आहेत. तर 31 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरातील 3562 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरामध्ये लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शुक्रवारी (दि. 14) दिवसभरात शहरातील 63 केंद्रावर 6656 जणांना लस देण्यात आली आहे.