Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 655 नवीन रुग्ण, 1956 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर शहरामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर अधिक होता. मात्र, आता या शहरामध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शहरातील रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 655 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 44 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 655 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 46 हजार 709 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1956 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 36 हजार 348 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 6 हजार 469 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 44 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 30 रुग्ण शहरातील आहेत. तर 14 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 3892 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.22) शहरामध्ये 62 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे. शनिवारी दिवसभरात 4004 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 4 लाख 77 हजार 389 जणांना लस देण्यात आली आहे.