Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 423 नवीन रुग्ण, 626 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने दुसऱ्या लाटेत थैमान घातले होते. रुग्णांची संख्या वेगाने वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून शहरातील रुग्णांची संख्या हजाराच्या खाली आली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात नवीन रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 423 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 423 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 47 हजार 132 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 626 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 36 हजार 974 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 6 हजार 239 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 24 रुग्ण शहरातील आहेत. तर 15 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 3916 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (दि.23) शहरामध्ये 33 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे. रविवारी दिवसभरात 2081 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 4 लाख 79 हजार 470 जणांना लस देण्यात आली आहे.