Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 862 ‘कोरोना’मुक्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज दिवसभरात 862 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्ण बरे होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरात 843 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1444 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 4 वाजेपर्यंत शहरामध्ये 843 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 68 हजार 439 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले 843 रुग्ण हे शहरातील आहेत. शहराबाहेरील 1150 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 454 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 21 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 14 रुग्ण शहरातील आहेत तर 7 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 1444 वर पोहचला आहे. यामध्ये 1109 रुग्ण शहरातील तर 335 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 862 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 57 हजार 914 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 5522 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये भोसरी, देहुरोड, काळेवाडी, चिंचवड, आकुर्डी, चिखली, निगडी, सांगवी, मावळ, येरवडा, खेड, भुम, रायगड, जुन्नर येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.