Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 629 नवीन रुग्ण, 405 जणांना डिस्चार्ज

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. राज्यात इतर जिल्ह्याप्रमाणे पुणे जिल्ह्यात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मध्यंतरी कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असताना गेल्या महिन्यापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 629 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात 405 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (रविवार) शहरामध्ये एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 9 हजार 034 वर पोहचली आहे. तर 1 लाख 2 हजार 339 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटले असले तरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

गेल्या 24 तासामध्ये एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला रुग्ण खेड येथील आहे. आतापर्यंत शहरात 2636 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1856 शहरातील तर 780 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1 हजार 237 रुग्ण अॅक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 182 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 53 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्रभाग निहाय आढळून आलेले रुग्ण
अ प्रभाग – 65, ब प्रभाग – 107, क प्रभाग – 68, ड प्रभाग – 102, इ प्रभाग – 81, फ प्रभाग – 68, ग प्रभाग – 75, ह प्रभाग – 63