Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2200 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, 13 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने या वर्षांतील उच्चांक गाठला आहे. शहरात वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य विभागाने नागरिकांना शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात तब्बल 2275 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2275 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 34 हजार 541 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1286 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 16 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 2643 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 रुग्ण शहरातील आहेत. तर 1 रुग्ण हद्दीबाहेरील आहे. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2803 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 1973 तर हद्दीबाहेरील 830 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण पिंपरी, चिखली, थेरगांव, वाकड, भोसरी, चिंचवड, पिंपळे निलख, हाडपसर येथील रहिवाशी आहेत.