Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1472 नवीन रुग्ण, 941 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात देखील मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1472 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 941 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरापालिका वैद्यकीय विभागाने दिली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 1472 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 36 हजार 013 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 941 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 17 हजार 492 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 2816 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 रुग्ण शहरातील आहेत. तर 2 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2809 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 1977 तर हद्दीबाहेरील 832 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण पिंपरी, चिखली, मोशी, पिंपळे सौदागर, खेड, मुंढवा येथील रहिवाशी आहेत.