Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2351 नवीन रुग्ण, 21 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्ण संख्या वाढत असताना मृत्यूची संख्या देखील वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहे. शासनाने कडक निर्बंध केले असले तरी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात 2351 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 1453 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरापालिका वैद्यकीय विभागाने दिली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2351 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 61 हजार 119 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1453 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 33 हजार 839 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 4492 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 15 रुग्ण शहरातील आहेत. तर 6 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2981 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2122 तर हद्दीबाहेरील 859 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण मोशी, दिघी, काळेवाडी, चिंचवड, पिंपळे सौदागर, देहुरोड, पिंपळे गुरव, थेरगाव, पिंपरी, चिंचवड, प्रेमलोक पार्क, भोसरी, वडगाव शेरी, कोरेगाव पार्क, औंध, खेड, कुसगाव, रविवार पेठ येथील रहिवाशी आहेत.